नॅशनल एबिलिंपिक्स २०२५ मध्ये महाराष्ट्र अव्वल — कौशल्यवान दिव्यांग स्पर्धकांनी आयसीटी, हॉस्पिटॅलिटी आणि सेवांमध्ये जिंकली १२ पदके, राज्य ठरले कौशल्यांचे पॉवरहाऊस
पुण्यातील ९, मुंबईतील ३ विजेते

मुंबई/महाराष्ट्र, २५ नोव्हेंबर २०२५: नॅशनल एबिलिंपिक्स २०२५ मध्ये महाराष्ट्राने यंदा चमकदार कामगिरी करत आपली ताकद पुन्हा दाखवून दिली. पुण्यातील ९ आणि मुंबईतील ३ अशा एकूण १२ पदकांसह राज्याने व्यावसायिक कौशल्य आणि समावेशक उत्कृष्टतेत देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले. नवी दिल्लीतील सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर्स इन्स्टिट्यूट (CSOI) येथे झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत, चार प्रादेशिक एबिलिंपिक्स नंतर निवडलेल्या २०हून अधिक राज्यांतील ५९ विजेते एकत्र आले. वर्षभर चाललेल्या या निवड प्रक्रियेत चेन्नई (दक्षिण), मुंबई (पश्चिम), लखनऊ (उत्तर) आणि गुवाहाटी (पूर्व व ईशान्य) येथे झालेल्या प्रादेशिक एबिलिंपिक्सस्पर्धांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट आणि नॅशनल एबिलिंपिक्स असोसिएशन ऑफ इंडिया (NAAI) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग (DEPwD), TPCDT आणि इंडसइंड बँक यांच्या सहकार्याने या राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वर्षीच्या एबिलिंपिक्स मध्ये एकूण २६ पदके देण्यात आली—८ सुवर्ण, १० रौप्य आणि ८ कांस्य—विविध कौशल्य कॅटेगरीतील पदकांचा समावेश होता. ही स्पर्धा दिव्यांगांसाठी उपजीविका कौशल्यांना प्रोत्साहन देणारी राष्ट्रीय पातळीवरील ‘वर्क स्किल ऑलिंपिक’ असून, रोजगारनिर्मिती आणि स्वावलंबनाला नवी दिशा देते.

महाराष्ट्राने आयसीटी कॅटेगरीत उत्कृष्ट कामगिरी केली. कॅरेक्टर डिझाइनमध्ये राज्याने आपले स्पष्ट वर्चस्व दाखवले—मुंबईच्या अविनाश आव्हाड (हियरिंग इम्पेअर्ड) यांनी सुवर्णपदक पटकावले, तर पुण्याचे किशोर मोहिते (हियरिंग इम्पेअर्ड) यांनी रौप्यपदक जिंकले. डेस्कटॉप पब्लिशिंगमध्येही पुण्याच्या हार्दिक शाह (हियरिंग इम्पेअर्ड) यांनी कांस्यपदक मिळवत आपली डिजिटल कलात्मकता ठळकपणे सिद्ध केली.

फोटोग्राफी (स्टुडिओ) मध्ये पुण्याची करुणा सूर्यवंशी (हियरिंग इम्पेअर्ड) हिने प्रकाश, रचना आणि तांत्रिक अचूकतेचे अप्रतिम प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकले. तर पुण्याचेच विवेक येरळकर (व्हिज्युअली इम्पेअर्ड) यांनी आपल्या संवेदनशील दृष्टीकोनाने प्रभाव पाडत कांस्यपदक पटकावले.

हस्तकला कॅटेगरीसाठी पुण्यातला अजित कराडे (हियरिंग इम्पेअर्ड) याने चित्रकला आणि सजावटीत कांस्यपदक मिळवले आणि क्रोशे कॅटेगरीत पुण्यातील सोनाली शिंदे (हियरिंग इम्पेअर्ड) हिने कांस्यपदक जिंकले.
हॉस्पिटॅलिटी कॅटेगरी मध्येही महाराष्ट्राची कामगिरी तितकीच चमकदार होती. मुंबईतील मोहम्मद काशिफ खान(हियरिंग इम्पेअर्ड)यांनी पॅटिसेरी आणि कन्फेक्शनरीमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यांची ही कामगिरी संपूर्ण स्पर्धेतल्या सर्वात उल्लेखनीय प्रदर्शनांपैकी एक ठरली. फ्रान्समधील 2023 आंतरराष्ट्रीय अबिलिंपिकमध्ये आधीच रौप्यपदक मिळवलेल्या काशिफचे पुढचे लक्ष्य आता 2027 फिनलंड अबिलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे आहे. केक डेकोरेशन प्रकारातही महाराष्ट्राला यश मिळाले—पुण्यातील आकाश क्षीरसागर (हियरिंग इम्पेअर्ड) यांनी कांस्यपदक पटकावले.

महाराष्ट्राने संपूर्ण स्वच्छता सेवातही जोरदार कामगिरी करत तिन्ही राष्ट्रीय पदके जिंकली. पुण्यातील शीतल लेंभे(हियरिंग इम्पेअर्ड) यांनी उत्कृष्ट तंत्र, बारकाई आणि आंतरराष्ट्रीय स्वच्छता मानकांचे काटेकोर पालन करून सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर पुण्यातील मनोहर नदीमेटला (हियरिंग इम्पेअर्ड) यांनी रौप्यपदक मिळवले, तर मुंबईतील प्रेरणा देसाई (इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी) यांनी कांस्यपदक पटकावले. या ‘क्लीन स्वीप’ने महाराष्ट्रातील मजबूत प्रशिक्षण व्यवस्था आणि हॉस्पिटॅलिटी व फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये तरुणांना तयार करण्याची राज्याची क्षमता अधिक ठळकपणे समोर आली.
या कार्यक्रमात बोलताना, NAAI चे सरचिटणीस आणि सार्थक एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक व सीईओ डॉ. जितेंद्र अग्रवाल म्हणाले, “आज नॅशनल एबिलिंपिक्समधील या विजेत्यांना पाहून आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो. त्यांच्या कामगिरीमुळे आम्हाला विश्वास मिळतो की भारत केवळ स्पर्धा करण्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर फिनलंड २०२७ मध्ये जागतिक पातळीवर नेतृत्वही करेल.
सार्थकने आजपर्यंत १.२५ लाख दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण, रोजगार आणि पुनर्वसनाद्वारे सक्षम केले आहे आणि विविध सामुदायिक कार्यक्रमांद्वारे ५.३ दशलक्षाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचले आहे. देशभरातील ६०% ग्रामीण भागांसह २,००० पेक्षा जास्त ठिकाणी उपस्थिती असल्यामुळे, सार्थक लवकर हस्तक्षेपातील तफावत भरून काढत आहे, शिक्षणातील अडथळे कमी करत आहे आणि वंचित समुदायांसाठी नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये मजबूत करत आहे.”
या वर्षीचे राष्ट्रीय विजेते आता त्यांच्या मोठ्या स्वप्नाच्या—फिनलंडमध्ये होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय एबिलिंपिक्स २०२७— आणखी एक पाऊल जवळ आले आहेत. हे जागतिक स्तरावर दिव्यांग व्यक्तींसाठी होणारे वर्क स्किल्सचे ऑलिंपिक मानले जाते. त्यांच्या या कामगिरीतून केवळ वैयक्तिक क्षमता आणि मेहनतच दिसून येत नाही, तर आर्थिक सक्षमीकरणासाठी भारतात समावेशक आणि कौशल्याधारित मार्ग उभा राहतो आहे, हेही स्पष्ट होते.
