ताज्या घडामोडी

एक सुखद योगायोग! रसिका वाखारकर आणि ऐश्वर्या शेटे पुन्हा ‘कलर्स मराठी’वर एकत्र

आजपासून छोटा पडदा गाजवायला सज्ज!

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर आजपासून मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ यांची ‘अशोक मा.मा.’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दोन्ही मालिका वेगळ्या धाटणीच्या असूनही या मालिकांची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकांची एक खास गोष्ट म्हणजे या दोन्ही मालिकेत ‘कलर्स मराठी’च्या माध्यमातून छोटा पडदा व्यापून टाकणाऱ्या रसिका वाखारकर आणि ऐश्वर्या शेटे या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या दोन्ही अभिनेत्रींच्या याआधी ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ आणि ‘रमा राघव’ या मालिका एकत्रच सुरू झाल्या होत्या. या दोन्ही मालिका चांगल्याच गाजल्या. आता पुन्हा एकदा रसिकाची ‘अशोक मा.मा.’ आणि ऐश्वर्याची ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिका एकत्रच सुरू होत आहेत. हा नक्कीच एक सुखद योगायोग आहे. आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला दोन्ही अभिनेत्री सज्ज आहेत. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही मालिका प्रेक्षकांना आजपासून संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळणार आहे. तर ‘अशोक मा.मा.’ ही मालिका प्रेक्षकांना रात्री 8:30 वाजता ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार आहे.

रसिका वाखारकर म्हणाली,”ऐश्वर्या आणि माझी ‘कलर्स मराठी’वर याआधी ‘रमा राघव’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिका एकाचदिवशी सुरू झाल्या होत्या. आता दुसरी मालिकासुद्धा एकाचदिवशी सुरू होणार आहे हा खरोखरच एक कमालीचा योगायोग आहे. आणखी एक भारी गोष्ट म्हणजे अगदी विरुद्ध स्वभावाचे पात्र आम्ही या दुसऱ्या मालिकेत साकारणार आहोत. तिची रमा एक मॉडर्न मुलगी होती.. आणि कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणारी भूमिका तिने साकारली होती. तर मी साकारत असलेल्या सावीची भूमिका गावातल्या रावड्या मुलीची होती. आता अगदी विरुद्ध भूमिका आम्ही साकारणार आहोत. मालिकेत मी भैरवीची भूमिका साकारणार आहे. जी अतिशय मॉर्डन मुलगी आहे. लंडनमध्ये जॉब करणारी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये वावरणारी.. आणि ती एक जळगावमधून आलेली अशी साधीशी, गोड मुलगी वल्लरीचं पात्र साकारत आहे. प्रेक्षकांनाही हे पाहायला खूप मजा येणार आहे. त्यांनी आधी आम्हाला एका वेगळ्या पात्रात पाहिलं होतं. आता वेगळ्या भूमिकेत आम्हाला पाहायला प्रेक्षकदेखील नक्कीच खूप उत्सुक असतील. प्रेक्षकांनी जसं सावी आणि रमावर भरभरून प्रेम केलं तसंच भैरवी आणि वल्लरीदेखील करतील याची मला खात्री आहे”.

ऐश्वर्या म्हणाली,”रसिका माझी खूप जवळची मैत्रिण आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आम्ही भेटलोच होतो ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ आणि ‘रमा राघव’ या मालिकांच्या प्रमोशनच्यावेळी. तेव्हा आमची छान मैत्री झाली. तेव्हाही आमच्या दोन्ही मालिका एकत्र लाँच झाल्या होत्या. आता योगायोगाने पुन्हा तेच होतंय. ‘अशोक मा.मा.’ आणि माझी ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या दोन्ही मालिका एकत्र सुरू होत आहेत. कदाचीत आम्ही दोघी एकमेकींसाठी खूप लकी आहोत. मला तिच्यासाठीही खूप छान वाटतंय. तिला अशोक मामांसोबत काम करायला मिळतंय. सावीपेक्षा वेगळी भूमिका ती या मालिकेत साकारणार आहे. या मालिकेत ती कमालच करणार आहे. दुसरीकडे मीदेखील रमापेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका या मालिकेत साकारणार आहे.’रमा राघव’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या जशा सुपरहिट ठरल्या… सावी आणि रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. तसचं माझी इच्छा आहे की, आता या दोन्ही मालिकादेखील सुपरहिट व्हाव्यात. दोन्ही मालिकांनी चांगला पल्ला गाठावा. यापुढेही पुढच्या अनेक मालिका आमच्या एकत्र लाँच होऊदेत. रसिकासोबत पुन्हा एकदा ‘कलर्स मराठी’वर माझं पदार्पण होतंय याचा मला आनंद आहे”.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.