ताज्या घडामोडी

मित्र पुन्हा भेटले मैत्रीच्या चित्रपटासाठी… सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाने केले ‘ताकुंबा’ साँग लाँच

परीक्षा संपल्या की सुरु होतो सुट्टीचा धमाल काळ! उन्हाळी सुट्टी म्हणजे फक्त मस्ती, खेळ, गंमतीजंमती. याच भन्नाट सुट्ट्यांच्या रंगतदार वातावरणात ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटातील ‘ताकुंबा’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्या हस्ते सोशल मीडियावर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. वार्षिक परीक्षा संपल्यावर मुले टेन्शन फ्री असतात आणि मग त्यांचे आवडीचे दिवस सुरु होतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत उनाडपणा, खेळ, गावभर फिरणे या सगळ्या नॉस्टॅलजीक क्षणांचा अनुभव या गाण्यातून मिळणार आहे. आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश) यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या धमाल, मस्ती आणि एनर्जीने भरलेले हे गाणे रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले असून त्यांचाच जबरदस्त आवाज या गाण्याला लाभला आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे शब्द दिग्दर्शक रोहन मापुस्कर व गीतकार प्रशांत मडूपवार यांनी लिहिले आहेत. सगळ्यांना थिरकायला लावणाऱ्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन स्टॅनली डिकॉस्टा यांनी केले आहे. 

 या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे यानिमित्ताने रोहन, मापुस्कर राजेश मापुस्कर, रेमो डिसूझा, मधुकर कोटीयन आणि स्टॅनली डिकॅास्टा हे एकत्र आले आहेत. करिअरला सुरूवात केल्यापासून यांची घट्ट मैत्री आहे. यानिमित्ताने मैत्रीच्या चित्रपटासाठी मित्र पुन्हा भेटले. 

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “ उन्हाळ्याच्या सुट्ट्या सगळ्यांच्याच आठवणीतल्या असतात. ‘ताकुंबा’ या गाण्यात उन्हाळ्याच्या सुट्टीतील मित्रांसोबतची मजा पाहायला आणि अनुभवायला मिळेल. हे गाणे करताना आम्हालाही आमच्या उन्हाळी सुट्ट्यांचे मित्रांबरोबरचे काही खास क्षण आठवले. यामुळे गाणे करताना आम्हालाही खूप मजा आली. मुळात आता परीक्षा संपून शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत, त्यामुळे हे सुट्टीचे मजेदार गाणे ऐकून तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना नक्कीच उधाण येईल, याची मला खात्री आहे.”

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ आज आम्ही सगळे मित्र एकत्र हा चित्रपट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आमचा मित्र रेमो याने ‘ताकुंबा’ हे आमचे मैत्रीचे गाणे लाँच केले आहे. ‘ताकुंबा’ हे गाणं प्रत्येक वयोगटाला ‘त्या’ काळात नेणारे आहे आणि आताच्या मुलांना गावातील धमाल दाखवणारे आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची प्रत्येकाची खास आठवण असते. त्याच आठवणींना उजाळा देणारे हे गाणं आणि हा चित्रपट आहे.’’

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.