क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

अभिनेते रमेश देव मार्गाचा नामकरण सोहळा संपन्न

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी चतुरस्र कामगिरी तब्बल सहा दशके करणारे ज्येष्ठ अभिनेते कै. रमेश देव यांच्या ९६ व्या जयंती दिनानिमित्ताने अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’* असे नामकरण करण्यात आले.

मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा गौरव करण्यासाठी निर्मिलेल्या *‘मराठी चित्रपट कट्टा’* चे लोकार्पण आणि रस्त्याचे नामकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून हे नामकरण करण्यात आले.

‘मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते रमेश देव यांची महती खूप आहे, या महान कलाकाराच्या नावाचा मार्ग होणे हे समस्त महाराष्ट्रासाठी आणि कलेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना आनंद देणारा दिवस असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. ‘मराठी चित्रपट कट्टा’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमदार अमित साटम, नगरसेवक रोहन राठोड या प्रत्येकाने आपल्यापरीने केलेलं काम महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी झाले त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.

याप्रसंगी बोलताना अभिनेते अजिंक्य देव म्हणाले, ‘आज संपूर्ण देव कुटुंबियांसाठी हा स्वप्नपूर्तीचा आणि आनंदाचा दिवस आहे. आज बाबांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. बाबांच्या नावाचा मार्ग झाला याचा खूप आनंद झाला आहे. यासाठी मी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, भाजप नेते विनोद तावडे, आमदार अमित साटम, नगरसेवक रोहन राठोड यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या प्रस्तावावर त्यांनी विचार करून पुढाकार घेत यासाठी परवानगी दिली. हे बाबांचे आशीर्वाद आहेत. याचा त्यांना ही निश्चितच आनंद झाला असेल.

याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ गायिका वैशाली सामंत, दिव्या खोसला कुमार, कांचन घाणेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.