क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

‘शिट्टी वाजली रे’च्या मंचावर का रडला अमित भानुशाली

वडिलांची आठवण सांगताना ठरलं तर मग मालिकेतल्या अर्जुनला अश्रू अनावर

स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेतून घराघरात पोहोचलेला अर्जुन अर्थात अमित भानुशालीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अमितच्या आयुष्यातला एक हळवा कोपरा त्याने नुकताच शिट्टी वाजली रे च्या मंचावर सांगितला. ठरलं तर मग मालिकेने अमितला यशाची चव चाखता आली, त्याला अभिनेता म्हणून ओळख मिळाली. मात्र अमित गेली बरीच वर्ष अभिनय क्षेत्रात आपलं नशिब आजमावतो आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेला अमित आयुष्यातला कटु आठवणींविषयी सांगताना म्हणाला, एका मालिकेसाठी जवळपास दीड वर्ष ऑडिशन देत होतो. त्यात यश मिळालं नाही तेव्हा जॉब करण्याचा निर्णय घेतला. ऑफर लेटर मिळाल्यानंतर ते पहिल्यांदा वडिलांच्या हातात ठेवलं तेव्हा बाबांनी ते लेटर फाडण्यास सांगितलं. तुझी स्वप्न तू पूर्ण कर बाकीचं सांभाळायला बाप आहे असं बाबांनी सांगितलं आणि मी जिद्दीने पुन्हा अभिनय क्षेत्रात स्वत:ला आजमावण्याचं ठरवलं. आज थोडं फार यश मिळालं आहे पण ते पाहायला बाबा नाहीत असं सांगताना अमितला अश्रू अनावर झाले.

अमितला त्याच्या वडिलांनी अभिनय क्षेत्रात येण्यास नेहमीच पाठिंबा दिला. मात्र पहिलं शिक्षण घे आणि मगच या क्षेत्रात करिअर कर असा त्यांचा हट्ट होता. त्यांचा शब्द राखत मी इंजिनिअर झालो. अभिनयाचं देखिल शिक्षण घेतलं. छोटी-मोठी पात्र करत होतो. मात्र म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. पण बाबांनी नेहमीच पाठिंबा दिला. कधीही घरची संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली नाही. एक काळ असा होता की बाबांना त्यांच्या व्यवसायात अपयश मिळालं. पण बाबा खचले नाहीत आणि आम्हालाही खचू दिलं नाही. त्यांचा हाच लढवय्या स्वभाव माझ्यात उतरला आहे. यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचून जायचं नाही ही त्यांची शिकवण मी कधीच विसरणार नाही आणि माझ्या मुलावरही मी असेच संस्कार करेन अशी भावना अमितने व्यक्त केली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.