क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

भाईंचा स्मृतिदिन ‘सुंदर’ होणार…!

सुंदर मी होणार’ नाटकाच्या निमित्ताने अभिनेता आस्ताद काळे व अभिनेत्री शृजा प्रभुदेसाई पहिल्यांदाच एकत्र

जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. तेव्हाची अनेक नाटकं आज इतक्या वर्षानंतरही नाट्य रसिकांच्या आणि निर्माता-दिग्दर्शकांच्या मनावर गारुड करून आहेत. यातील काही नाटकांना पुनरुज्जीवित करण्याचे धाडस आजचे काही निर्माते करताना दिसत आहेत. ‘पुलं’च्या समर्थ लेखणीतून प्रकटलेलं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक ‘पुलं’च्या स्मृतिदिनी आणि ज्येष्ठ साहित्यिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देखण्या नट संचात रंगमंचावर दाखल होणार आहे. पुलंचे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत.

या नाटकाच्या निमित्ताने दोन गुणी कलाकार पहिल्यांदाच एकत्र रंगमंचावर पाहायला मिळणार आहेत. अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री शृजा प्रभुदेसाई ही नवी जोडी या नाटकच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे. या दोघांसोबत आता या नाटकात अजून कोणते कलाकार झळकणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. करण देसाई आणि आकाश भडसावळे निर्मित करीत असलेल्या या नाटकाचा नुकताच शानदार मुहूर्त मुंबईत संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री (पद्मश्री) नयना आपटे, पुलंचे पुतणे श्री. जयंत देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आवर्जून उपस्थित होते. तरुण पिढीलाही पुलंची लेखणी अजून भुरळ घालीत असल्याचे समाधान व्यक्त करून या नवीन पण समर्थ संचातील नाटकास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 त्या त्या काळात रंगभूमीवर येऊन गेलेल्या अनेक अजरामर नाट्यकलाकृती स्मरणरंजनाच्या पुनःप्रत्ययाच्या आनंदासोबत काहीतरी विचार देऊ पाहण्याच्या उद्देशाने नव्याने रंगभूमीवर येत असतात. याच मांदियाळीतलं पु.ल.देशपांडे यांच्या लेखणीतून सजलेलं नाट्यकृतीतलं एक सुंदर पान उलगडलं जातंय याचा आनंद दिग्दर्शक राजेश देशपांडे व्यक्त करतात. 

पुलंचा २५ वा स्मृतीदिवस आणि सुनीताबाईंचे जन्मशताब्दी वर्ष या निमित्ताने पुलं-सुनीताबाई या जोडीने एकत्रित भूमिका केलेलं एकमेव नाटक म्हणजे ‘सुंदर मी होणार’ आणि म्हणून या वर्षी ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचे प्रयोग करून या दोघा ज्येष्ठ कलावंतांना मानवंदना द्यावी या उद्देशाने आम्ही हे नाटक करण्याचा आग्रह धरल्याचे निर्माते करण देसाई आणि आकाश भडसावळे यांनी सांगितले. 

सुंदर मी होणार’ हे नाटक पु. ल. देशपांडे यांनी तीन इंग्रजी कथानकांवर आधारित लिहिले असले तरीही महाराष्ट्राच्या मराठी मातीचा एक छान गंध आणि मराठमोळेपण देऊन या नाटकाला त्यांनी अधिकच सुंदर केले आहे. नुकतेच आपले संस्थान हिंदुस्थान सरकारच्या ताब्यात गेलेला एक हतबल संस्थानिक आणि त्याच्या विचित्र लहरींखाली दबलेली त्याची मुलं अशी या नाटकाची वरपांगी कथा दिसत असली तरी, ‘सुंदर मी होणार, आतां सुंदर मी होणार । सुंदर मी होणार! हो! मरणाने जगणार … मृत्यू म्हणजे वसंत माझा मजवरती खुलणार’ या कवी गोविंदांच्या ओळींनुसार आपल्याही आजूबाजूच्या अशा अनेकींच्या पायात, कधी दृश्य तर कधी अदृश्य मानसिक पारतंत्र्याच्या बेड्या पडलेल्या आपण पाहतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी भान यावं लागतं. मला वाटतं हेच पु.ल. देशपांडे यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकातून अधोरेखित केलं आहे.

नाटकाचे संगीत मिलिंद जोशी यांचे आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. नाटकाचे व्यवस्थापन नितीन नाईक यांचेकडे आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.