क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

प्रो कबड्डी स्पर्धेत पुणेरी पलटणने युपी योद्धाजला बरोबरीत रोखले

पुणेरी पलटणची चौथ्यांदा बरोबरी

नोएडा – अखेरच्या दीड मिनिटांत भवानी रजपूतला रोखण्यात अपयश आलेल्या पुणेरी पलटण संघाला प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात झुंजार खेळ करुनही २९-२९ असे बरोबरीवर समाधान मानावे लागले. अखेरच्या दीड मिनिटांत महत्वपूर्ण तीन गुणांची कमाई करुन भवानीने संघाचा पराभव टाळला. पुणेरी पलटणकडून कर्णधार पंकज मोहिते आणि व्ही, अजित कुमार यांचा खेळ उल्लेखनीय झाला.

 

अस्लम इनामदार पाठोपाठ मोहित गोयत यांच्या गैरहजेरीत पुणेरी पलटणची चढाईची बाजू पूर्वार्धात निश्चित दुबळी दिसून आली. मात्र, उत्तरार्धात पंकज मोहितेने केलेल्या दमदार चढायांमुळे पलटणला सामन्यात आव्हान राखणे शक्य झाले होते. पंकजने ९ गुणांची कमाई केली. व्ही. अजितकुमारने ५ गुणांची कमाई करताना त्याला सुरेख साथ केली. पलटणने संघात आज अनेक बदल देखिल केले. त्यामुळे पूर्ण सामन्यात संघ काहिसा अस्थिर वाटला. डावा कोपरारक्षक अमनच्या जागी संधी मिळालेल्या मोहितने ४ आणि गौरव खत्रीने ३ गुण नोंदवत आपले काम चोख बजावले. युपी योद्धाज कडून भवानीचे सुपर टेन वगळता अन्य खेळाडूला मोठी चमक दाखवता आली नाही. मात्र, प्रत्येकाने गुणांची कमाई केल्याचा युपी योद्धाजला फायदा झाला.

मध्यंतरानंतर हळू हळू चढाईपटूंनी लय मिळवली. पलटणसाठी पंकज मोहिते आणि युपी योद्धाजसाठी भवानी राजपूत यांच्या चढाया महत्वाच्या ठरत होत्या. यामुळे पलटणला उत्तरार्धातील पहिल्या टप्प्यात २०-२० अशी बरोबरी राखता आली. अखेरच्या टप्प्यातील सुरुवातीलाच पुणेरी पलटणने यु पी योद्धाजवर लोण चढवत आघाडी २५-२१ अशी आपल्याकडे झुकवली. त्यानंतर पलटणने सातत्याने चार गुणांची आघाडी राखली होती. मात्र, दीड मिनिट शिल्लक असताना भवानी रजपूतने कौशल्याने मध्यरेषा गाठत दोन गुणांची कमाई करताना सामना २८-२९ अशा रंगतदार स्थितीत आणला. अखेरच्या एक मिनिटांत युपी संघाने एका गुणाची कमाई करताना सामना २९-२९ असा बरोबरीत सोडवला.

 

पूर्वार्धात ४-० अशा धडाकेबाज सुरुवातीचा फायदा पुणेरी पलटणला उठवता आला नाही. सामन्यात लय पकडल्यावर युपी योद्धाजच्या बचावपटूंसमोर पलटणचे चढाईपटू अपयशी ठरले. अर्थात, युपी अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांचे चढाईपटूही पलटणच्या बचावपटूंना समर्थपणे आव्हान देऊ शकत नव्हते. पण, पलटणवर लोण चढवल्याचा फायदा त्यांना मध्यंतराला १६-१४ अशी आघाडी मिळवून देण्यात निर्णायक ठरला.

 

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.