वेस्ट झोन ॲबिलिम्पिक्स कौशल्य स्पर्धा आणि सार्थकच्या 17व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचे मुंबईत आयोजन
फिनलंड 2027 साठी दिव्यांगांना कौशल्यसिद्ध करण्यावर देणार भर
मुंबई, 1 जुलै 2025 — भारताची आर्थिक राजधानी आणि महत्त्वाकांक्षा आणि वैविध्याला चालना देणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत 4 आणि 5 जुलै 2025 रोजी ‘वेस्ट झोन रिजनल ॲबिलिम्पिक्स आणि सार्थकचा 17वा वर्धापन दिन’ हा देशातील एक सर्वात प्रभावी समावेशक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल ॲबिलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया (एनएएआय) आणि सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट यांनी केले आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभाग, भारत सरकार, टीपीसीडीटी आणि इंडसइंड बँक यांचे या उपक्रमाला पाठबळ लाभले आहे. फिनलंडमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या 11व्या आंतरराष्ट्रीय ॲबिलिम्पिक्स स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतात सुरू असलेल्या मोहिमेचा हा एक भाग आहे.
दक्षिण विभागातील चेन्नई येथील यशस्वी आयोजनानंतर मुंबईतील हा कार्यक्रम ‘ॲबिलिम्पिक्स कौशल्य स्पर्धा व परिषदा 2025’ या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा टप्पा ठरणार आहे. या सोबतच दिव्यांग व्यक्तींचा कौशल्यविकास, रोजगार आणि समावेशाच्या माध्यमातून सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या ‘सार्थक’ या संस्थेच्या 17 वर्षांच्या वाटचालीचाही हा गौरव सोहळा आहे.
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांतील स्पर्धक 15 व्यावसायिक कौशल्य गटांमध्ये आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. क्राफ्ट्स, आयसीटी, हॉस्पिटॅलिटी आणि सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या स्पर्धांमध्ये स्टुडिओ फोटोग्राफी, कॅरेक्टर डिझाइन, इंग्रजी डेस्कटॉप पब्लिशिंग, हाताने विणकाम, क्रोशे, टोपल्या तयार करणे, हेअरड्रेसिंग, मसाज, फॅशन डिझाइन, केक डेकोरेशन, पॅटिसेरी आणि कन्फेक्शनरी, इंजिनिअरिंग डिझाइन आणि क्लीनिंग सर्व्हिसेस यांसारख्या कौशल्यांचा समावेश आहे. फिनलंड ॲबिलिम्पिक्सने निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या सर्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, जेणेकरून फिनलंड ॲबिलिम्पिक्स 2027 साठी भारत सज्ज होईल.
या स्पर्धांव्यतिरिक्त या कार्यक्रमात धोरणकर्ते, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) क्षेत्रातील लीडर्स, दिव्यांगांना रोजगारसंधी देणारे नियोक्ते, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवप्रवर्तक यांच्यासोबत चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सहाय्यक तंत्रज्ञान, समावेशक भरती प्रक्रिया, माध्यमांमधील प्रतिनिधित्व आणि दिव्यांग व्यक्तींकरिता व्यापक स्वरूपात राबवता येणारी कौशल्यविकास मॉडेल्स यावर या चर्चेत भर देण्यात येईल.
या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा, भारत सरकारच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अतिरिक्त सचिव श्रीमती मनमीत कौर नंदा, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागाचे आयुक्त श्री नितीन पाटील, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे अध्यक्ष डॉ. विजय कालंत्री तसेच अन्य प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील परिवर्तनकर्त्यांचा समावेश आहे.
“ही केवळ एक स्पर्धा नाही, तर देशभरातील लाखो दिव्यांगांना आर्थिक सन्मान, आत्मविश्वास आणि करिअरची संधी मिळवून देणारी चळवळ आहे,” असे एनएएआयचे सरचिटणीस आणि ‘सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट’चे संस्थापक आणि सीईओ डॉ. जितेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. “सार्थकमध्ये आम्ही केवळ कौशल्य विकसित करत नाही, तर आयुष्य घडवत आहोत. 2027 पर्यंत 1 कोटी दिव्यांगांचे सबलीकरण करणे आणि त्यापैकी 2 लाखांहून अधिक व्यक्तींना शाश्वत रोजगाराच्या संधी मिळवून देणे, हे आमचे मिशन आहे.”
हा उपक्रम दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्यविकासासाठीच्या राष्ट्रीय कृती आराखड्याशी (एनएपी-एसडीपी) सुसंगत आहे. याला ‘सार्थक’च्या ‘ज्ञानसारथी’ या भारतातील पहिल्या दिव्यांगांसाठी सुलभ अशा ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचे भक्कम पाठबळ लाभले आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लवचिक, विस्तारयोग्य आणि सर्वसमावेशक स्वरूपात कौशल्य प्रशिक्षण देण्यास प्रोत्साहन देण्यात येते.
ही चळवळ केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्षात आकार घेत आहे. 2023 मध्ये फ्रान्समधील मेट्झ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ॲबिलिम्पिक्स स्पर्धेत भारताने 12 कौशल्यगटांमध्ये 13 स्पर्धक पाठवले आणि 7 पदके जिंकत उल्लेखनीय कामगिरी केली. यात 1 सुवर्ण, 2 रौप्य, 3 कांस्य आणि 1 ‘मेडल ऑफ एक्सलन्स’चा समावेश होता. पेंटिंग आणि वेस्ट रियूझ गटात सुवर्णपदक विजेता चेतन पाशिलकर आणि फोटोग्राफी गटातील पदक विजेता पी. साई कृष्णन यांसारख्या यशोगाथा स्पष्ट दिसून येते की योग्य प्रशिक्षण आणि योग्य व्यासपीठ मिळाले, तर आयुष्यात परिवर्तन घडू शकते.
फिनलंड 2027 साठी भारताची तयारी अधिक बळकट करण्याबरोबरच मुंबईत होणारा हा कार्यक्रम ‘सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट’च्या 17 वर्षांच्या वाटचालीचा एक प्रेरणादायी सोहळा आहे. अडथळे पार करून मुख्य प्रवाहात स्थान मिळवलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या प्रवासावरही या कार्यक्रमात प्रकाश टाकण्यात येणार आहे. लाइव्ह स्कील कॉम्पिटिशन आणि , समावेशक संवाद (विविध पार्श्वभूमीतील लोकांना समान आदर आणि संधी देत मते मांडणारा खुला संवाद), नियोक्ते आणि परिवर्तनकर्त्यांशी नेटवर्किंग यांचा समावेश असलेला वेस्ट झोन ॲबिलिम्पिक्स कार्यक्रम हा भारताच्या समावेशकतेच्या चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
मुंबई जेव्हा या राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी होते, तेव्हा एक स्पष्ट संदेश दिला जातो — दिव्यांगत्व म्हणजे अपूर्णता नाही, तर व्यक्त न झालेली प्रतिभा आणि संधींचा एक अमर्याद साठा आहे. वेस्ट झोन ॲबिलिम्पिक्स 2025 हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर सर्वसमावेशक, कौशल्यसंपन्न आणि सशक्त भारताच्या भविष्यासाठी दिलेला एक ठोस जाहीरनामा आहे.