क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

बेबीराजेच्या वाटेवरून पुन्हा रंगभूमीकडे – स्वानंदी टिकेकरला लागला ‘सुंदर मी होणार’चा ध्यास

मराठी रंगभूमीवरचा एक अविस्मरणीय ठेवा – पु. ल. देशपांडे यांचं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर येत आहे. निमित्त आहे पुलंचा २५ वा स्मृतिदिन आणि त्यांच्या पत्नी, लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष. या खास पर्वावर सादर होणाऱ्या नव्या प्रयोगात ‘बेबीराजे’ ही महत्त्वाची भूमिका साकारतेय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर.

स्वानंदी जवळपास तीन वर्षांनंतर व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. याआधी ‘१०३’, ‘डोंट वरी बी हॅपी’ सारख्या लोकप्रिय नाटकात झळकलेली ही अभिनेत्री, सध्या हिंदीतील ‘महानगर के जुगनू’ आणि इंग्रजीत ‘मिडल क्लास ड्रिम्स ऑफ समर नाईट’ या दोन नाटकांत भूमिका साकारत आहे. मात्र ‘सुंदर मी होणार’च्या निमित्ताने ती पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे वळली आहे.

“मला निर्माता आकाश भडसावळेचा फोन आला, आणि त्याने विचारलं – ‘नाटक करणार का?’ त्याचवेळी त्याने या नाटकाचं नाव सांगितलं आणि मला वाटलं, इतकी सुंदर संहिता आणि तेही पुलंचं नाटक – मी नाही म्हणण्याचा विचारच करू शकले नाही,” असं स्वानंदी सांगते. पुलंच्या लेखणीबद्दल असलेला आदर आणि त्यांच्या नाट्यसंहितेची ताकद तिच्या शब्दांमधून सहज उमटत होती.

‘बेबीराजे’ ही व्यक्तिरेखा तिच्या अंतर्मनाच्या अगदी जवळची आहे. ही व्यक्तिरेखा थोडीशी बंडखोर, मतस्वातंत्र्य असलेली, आणि आत्मभान जपणारी आहे – म्हणजेच आजच्या काळाशी पूर्णतः सुसंगत. “बेबीराजे नेमकी माझ्यासारखी वाटते. तिची स्वतःची मतं आहेत. ती आपलं काहीतरी वेगळं शोधू पाहते. जे आपल्याला सहज मिळालंय, त्याच्या पलीकडेही काही आहे का, हे शोधणारी ती – म्हणूनच मला ही भूमिका फारच भावली,” असं ती भावनिक स्वरात म्हणाली.

पुलंच्या नाटकात काम करणं ही तिच्यासाठी केवळ कलात्मक संधी नाही, तर श्रद्धेचा अनुभव आहे. “मी हे नाटक पाहिलं होतं, पण वाचलं नव्हतं. आणि आता पुलंच्या स्वतःच्या हातून लिहिलेल्या ओळी रंगमंचावर बोलता येणार आहेत, ही कल्पनाच खूप पवित्र वाटते,” असेही ती नम्रतेने मान्य करते.

‘बेबीराजे’ ही केवळ एका घरातल्या मुलीची गोष्ट नाही – ती नव्या विचारांची, सामाजिक चौकटी मोडण्याच्या प्रयत्नांची गोष्ट आहे. आजची तरुणाई ज्या संघर्षांमधून स्वतःचं वेगळं स्थान शोधते, त्याच दिशेचा प्रवास या व्यक्तिरेखेचा आहे. म्हणूनच ही भूमिका नाकारणं तिच्यासाठी शक्यच नव्हतं.

या नाटकाचं दिग्दर्शन अनुभवी दिग्दर्शक राजेश देशपांडे करणार आहेत. देशपांडे यांनी यापूर्वीही पु. ल. देशपांडे यांचं ‘ती फुलराणी’चं दिग्दर्शन केलं आहे. त्याचबरोबर भाषाप्रभू वसंत कानेटकर यांचं ‘हिमालयाची सावली’ याही नाटकांचं दिग्दर्शन करून त्यांनी कानिटकरी भाषेला न्याय दिला आहे. त्यांचा रंगभूमीवरील अनुभव ‘सुंदर मी होणार’च्या नव्या सादरीकरणात मोठा विश्वास निर्माण करतो.

नाटकाची निर्मिती करण देसाई आणि आकाश भडसावळे यांनी केली आहे. नाटकात स्वानंदी (बेबीराजे) सोबत आस्ताद काळे (संजय), श्रुजा प्रभुदेसाई (दीदीराजे) यांसारखे कसलेले कलाकार काम करत आहेत. त्यांच्या जोडीने ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला नवा आश्वासक चेहरा सृजन देशपांडे, श्रुती पाटील, निलेश दातार ही नट मंडळी साहाय्यक भूमिकांतून दिसणार आहेत. संगीताची जबाबदारी मिलिंद जोशी, नेपथ्य संदेश बेंद्रे, वेशभूषा मंगल केंकरे यांच्याकडे असून, व्यवस्थापनाची धुरा नितीन नाईक यांनी सांभाळली आहे.

नाटकाचा शुभारंभ पुलंच्या २५ व्या स्मृतीदिनी म्हणजेच गुरुवार १२ जून २०२५ या दिवशी पुण्यात आणि शुक्रवार १३ जून या दिवशी मुंबईत होणार आहे. विशेष म्हणजे नाटकातील अजून तीन महत्वाच्या व्यक्तीरेखा महाराज, डॉक्टर आणि सुरेश कोण साकारणार याबद्दल रसिकांमध्ये उत्कंठा आहे.

‘सुंदर मी होणार’ ही केवळ एका घराच्या चार भिंतींत घडणारी घटना नाही – ती एका संपूर्ण युगाच्या मानसिकतेचा आरसा आहे. आणि त्या आरशात ‘बेबीराजे’सारखी व्यक्तिरेखा उभी करताना स्वानंदी टिकेकर पुन्हा एकदा रंगभूमीवर तीव्रतेनं, सच्चेपणानं आणि सुंदरतेनं उमटेल असा विश्वास वाटतो.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.