‘पाच वर्षांनी पुन्हा मराठी मालिकेत परतले’– केतकी कुलकर्णी
अनिकाच्या भूमिकेसाठी मी गाडी चालवायला शिकले.
‘झी मराठी’वरील ‘कमळी’ मालिकेतून अभिनेत्री केतकी कुलकर्णी पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. *‘अनिका’* ही व्यक्तिरेखा साकारताना केतकीने आपल्या अभिनय कौशल्याचा नवा आयाम सादर केला आहे. तिच्याशी खास गप्पा मारल्या, पहिल्या शूटपासून ते कॅरेक्टर तयार करण्याच्या प्रवासाबद्दल. “कमळीच्या पहिल्या दिवसाच्या शूटिंग अनुभव अजूनही अगदी ताजा आहे माझ्या आठवणीत. तो दिवस होता आमचा प्रोमोशूटचा. सकाळी खूप लवकर मी सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शूटसाठी गेले. या कॉलेजमध्ये माझे अनेक मित्र शिकत आहेत, त्यामुळे तिथे शूट करणं हेच खूप खास वाटत होतं. विशेष म्हणजे त्या दिवशी एक डान्स आणि रॅप सीन होता. आमच्यासोबत एक कोरिओग्राफर होते, त्यांनी मला स्टेप्स शिकवल्या. मी रिहर्सल करून लगेच शूटसाठी तयार झाले. शूटच्या वेळी दोन नवीन रॅप ओळी अॅड झाल्या, आणि त्या ही मी पटकन आत्मसात केल्या. तो अनुभव खूप मजेशीर होता, कारण मी पहिल्यांदाच रॅप सीन करत होते आणि तोही अशा मोठ्या सेटवर. त्यामुळे पहिलाच दिवस मला खूप काही शिकवून गेला आणि कायम लक्षात राहील असा होता. अनिकाच्या भूमिकेसाठी माझी निवड झाल्यावर जेव्हा मला कळले, तेव्हा मी खूपच आनंदात होते. ही एक खलनायिकेची भूमिका आहे, आणि जेव्हा मला कळलं की मी या भूमिकेसाठी लॉक झाली आहे, तेव्हा सर्वात आधी मी आई-बाबांना सांगितलं. या क्षेत्रातपासून मी काही काळासाठी दूर गेले होते, तब्बल पाच वर्षांनंतर मला पुन्हा ही संधी मिळाली आणि त्यामुळे असं वाटत होतं की जणू मी पुन्हा माझ्या घरात परत आले आहे. अभिनयाच्या या प्रवासात इतक्या वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करणं, हे माझ्यासाठी खूपच मोठं आणि भावनिक क्षण होतं. पहिला प्रोमो आल्यावर प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद छान मिळाला खास करून माझ्या रॅपवर, अभिनयावर आणि एकूण प्रोमोच्या लूकवर खूप प्रेम मिळालं. माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला. अनेक नातेवाईकांनी फोन करून कौतुक केलं, काहींनी तर व्हॉट्सअॅप स्टेटस आणि इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रोमो शेअर केला.असं वाटलं की आपल्यातल्या मेहनतीला खरी दाद मिळतेय. प्रेक्षकांनी जर एखाद्या प्रोमोवर एवढा चांगला प्रतिसाद दिला, तर मालिकेला किती प्रेम मिळेल याची कल्पनाच करवत नाही.
‘अनिका’ च्या भूमिके बद्दल सांगायचे झाले तर ही एक श्रीमंत आणि लाडावलेली मुलगी आहे. ती मोठ्या घरातून आलेली असली तरी तिने आपल्या मेहनतीने राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ती विरोधी व्यक्तिरेखा असली, तरी तिच्या प्रत्येक कृतीला तिचा एक वेगळा दृष्टीकोन आहे. अनिकाचं आयुष्य खूप शिस्तबद्ध आणि एलिट राहणीमान असलेलं आहे. तिला तिच्या आई आणि आजीवर खूप प्रेम आहे. त्या दोघी तिच्या आयुष्यातील आधारस्तंभ आहेत. अनिकाचं स्वप्न आहे की ती कोणतीही गोष्ट तिच्या प्रतिष्ठेचा त्याग न करता पूर्ण करेल मग त्यासाठी संघर्ष कितीही मोठा असो. या पात्रासाठी मला काही गोष्टी नव्यानं शिकाव्या लागल्या. उदाहरणार्थ , मी गाडी चालवायला शिकले कारण मालिकेत अनिकाला ड्रायव्हिंग करताना दाखवलं जाणार होतं, आणि खरंतर मला आधी गाडी चालवण्याची थोडी भीती वाटायची. पण मी ती अडचण पार केली, आणि आता तेही आत्मविश्वासाने करत आहे. प्रत्येक भूमिकेची वेगळी पार्श्वभूमी असते, वेगळी मानसिकता असते. ‘अनिका’ हे पात्र मराठी आहे, त्यामुळे माझ्यासाठी ती एक वेगळी जबाबदारी आहे. जरी ही निगेटिव्ह लीड असली, तरी तिला फक्त वाईट समजणं चुकीचं ठरेल. तिच्या कृती मागे एक लॉजिक आहे, तिच्या भावना आहेत. त्या समजून घेतल्या की प्रेक्षकांनाही तिच्याशी कनेक्ट होता येईल. एक अभिनेत्री म्हणून मी नेहमीच विविध प्रकारच्या भूमिका स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे मग ती एखाद्या विनोदी पात्राची असो, किंवा अगदी भयपटातली भूमिका असो. प्रत्येक भूमिकेसाठी तयारी लागते, मेहनत लागते, आणि ‘अनिका’साठी ती निश्चितच केली आहे. प्रेक्षकांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिलं आहे. आता मी ‘कमळी’ मालिकेतून पुन्हा एकदा त्यांच्या भेटीला आले आहे, तेव्हा त्यांचं प्रेम आणि पाठिंबा खूपच महत्त्वाचा आहे. या पात्रामध्ये एक वेगळेपण आहे. ती फक्त खलनायिका नाही, तर एक ठाम, आत्मविश्वासाने भरलेली आणि महत्त्वाकांक्षा असलेली मुलगी आहे. माझ्या या नव्या प्रवासासाठी आणि भूमिकेसाठी प्रेक्षकांची साथ मिळावी, हीच मनापासून इच्छा आहे.”