दिमाखात पार पडला स्टार प्रवाहच्या हळद रुसली कुंकू हसलं मालिकेचा लॉन्च सोहळा
समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकरच्या डान्स परफॉर्मन्सने वाढवली कार्यक्रमाची शोभा

७ जुलैपासून स्टार प्रवाहच्या परिवारात दाखल होतेय नवी मालिका हळद रुसली कुंकू हसलं. एकीकडे मातीशी नाळ जोडलेली आणि शेतकरी असल्याचा प्रचंड अभिमान असणारी कृष्णा तर दुसरीकडे शहराच्या वेगासोबत धावणारा आणि खेड्याविषयी कमालीचा तिटकारा असणारा दुष्यंत. दोन वेगळ्या मतांच्या या दोघांची भेट होते खरी पण ही नव्या नात्याची सुरुवात असेल का? मातीचा दरवळ खरंच दुष्यंतचं मन बदलेल की शहराच्या झगमगाटात तो रमेल याची अतिशय उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका. नुकताच या मालिकेचा दिमाखदार लॉन्च सोहळा पार पडला. या खास प्रसंगी कृष्णा आणि दुष्यंत यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करण्यात आला. कृष्णा आणि दुष्यंत म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांनी मालिकेच्या शीर्षकगीतावार खास सादरीकरण करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
समृद्धी केळकर कृष्णा या पात्राविषयी सांगताना म्हणाली, ‘टेलिव्हिजन हे माझं सर्वात आवडतं माध्यम आहे. मला असं वाटतं की या माध्यमाद्वारे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून मनोरंजन करु शकतो. दोन अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येताना अतिशय आनंद होतोय. चांगल्या भूमिकेच्या शोधात होते आणि या रोलसाठी विचारणा झाली. या भूमिकेविषयी ऐकताच ती मला क्षणात भावली. कृष्णाच्या निमित्ताने खूप गोष्टी नव्याने शिकता येणार आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. कीर्ती खूप शिकलेली, स्वत:च्या मतावर ठाम आणि सर्वांना सांभाळून घेणारी होती. कृष्णा थोडी वेगळी आहे. कोल्हापुरच्या मातीत ती वाढली आहे. शिकलेली नसली तरी शेतीचं ज्ञान अवगत असणारी. या मालिकेत माझा लूकपण पूर्णपणे वेगळा आहे. नो मेकअप लूक आहे असं म्हण्टलं तरी चालेल. शेतात राबणारी कृष्णा साकारत असल्यामुळे जाणीवपूर्वक मेकअप टाळतेय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची गोष्ट कोल्हापुरातली आहे त्यामुळे कोल्हापुरी भाषेचा लहेजा शिकतेय. प्रेक्षकांना हे नवं पात्र आणि नवी मालिका नक्की आवडेल याची खात्री आहे.’
मन धागा धागा जोडते नवा मालिकेनंतर अभिनेता अभिषेक रहाळकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत तो दुष्यंत हे पात्र साकारणार आहे. अभिनेता अभिषेक रहाळकर नव्या मालिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो आपल्या लूकवर मेहनत घेतोय. ‘मी स्वत:ला खूप नशिबवान समजतो की चांगल्या गोष्टी चांगल्या लोकांबरोबर करण्याची मला संधी मिळत आलीय. या मालिकेच्या बाबतीतही असंच म्हणावसं वाटेल. दुष्यंत हे पात्र याआधीच्या साकारलेल्या पात्रापेक्षा वेगळं आहे. प्रेक्षकांनी नव्या रुपात स्वीकारावं हीच इच्छा व्यक्त करेन अशी भावना अभिषेक रहाळकरने व्यक्त केली.’
समृद्धी केळकर, अभिषेक रहाळकर, पूजा पवार-साळुंखे, आस्ताद काळे, बाळकृष्ण शिंदे, विद्या संत, अमित परब, रवी कुलकर्णी, माधवी जुवेकर, मृदूला कुलकर्णी, ज्योती निमसे ही कलाकार मंडळी या मालिकेत लक्षवेधी भूमिकेत दिसतील. आई कुठे काय करते मालिकेचं दिग्दर्शन केलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवींद्र करमरकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. कसा असेल कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्याचा प्रवास पहायचं असेल तर हळद रुसली कुंकू हसलं मालिका नक्की पहा ७ जुलैपासून दुपारी १ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.