ताज्या घडामोडी

मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच होणार चित्रीकरणाला सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीत ‘थप्पा’ हा एक भव्य आणि हटके मल्टीस्टारर चित्रपट आता दाखल होणार आहे. हिंदी मल्टीस्टारर चित्रपटांनाही टक्कर देईल, असा बिग बजेट, दमदार कथानक आणि ताकदीची कास्टिंग घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिड विंचूरकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

‘थप्पा’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ड्रीम स्टारकास्ट. वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके, गौरव मोरे, डॅनी पंडित, सखी गोखले आणि साईंकित कामत हे लोकप्रिय आणि दमदार कलाकार एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. या सर्व कलाकारांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून इतकी मोठी स्टारकास्ट एकत्र पाहाण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे. नवे चेहरे, नवे जोडीदार असल्याने यात नवीन केमिस्ट्री पाहायला मिळेल, त्यामुळ हा अनुभव खऱ्या अर्थाने ताजा, वेगळा आणि थरारक ठरणार आहे.

स्टुडिओ लक्स आणि फिफ्टी टू फ्रायडे निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह आणि अमित भानुशाली निर्माते असून, निर्मितीमूल्यांच्या बाबतीतही ‘थप्पा’ हा मराठीतील मोठा आणि समृद्ध सिनेमा ठरणार आहे. यापूर्वी फिफ्टी टू फ्रायडेच्या सहयोगाने ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘मुंबई पुणे मुंबई ३’, ‘गर्ल्स’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘स्माईल प्लीज’ असे अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर ‘फोटो प्रेम’ या मराठी चित्रपटाचे आणि ‘शिकायतें’ या हिंदी वेब सीरिजचे मेहुल शाह निर्माते आहेत. 

हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे का, एखादी प्रेमकथा मांडणार का की, फसवणूक, सूड किंवा काहीतरी वेगळं रहस्य उलगडणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळेच प्रेक्षकांच्या कुतूहलात अधिक भर पडली असून, नेमकं काय पाहायला मिळणार आहे यासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दिग्दर्शक सिड विंचूरकर म्हणतात, “ सध्या तरी अनेक गोष्टी गोपनीय असून ताकदीच्या स्टारकास्टमुळे हा सिनेमा प्रेक्षकांवर भव्य ठसा उमटवेल, याची खात्री आहे. चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून संपूर्ण टीम अत्यंत उत्साही आहे. प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि प्रभावी घेऊन येत आहोत.”

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.