ताज्या घडामोडी

शिवसंस्कार महोत्सव 2025: मराठा किल्ल्यांचा युनेस्को सन्मान साजरा करणारा आठवडाभराचा सांस्कृतिक महोत्सव

सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई आयोजित ७ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यानचा आठवडाभर साजरा होणारा सांस्कृतिक उपक्रम

मुंबई 2 सेप्टेंबर २०२५ – युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा दुर्गांचा ऐतिहासिक समावेश झाल्यामुळे महाराष्ट्र संस्कृतीकडे जागतिक स्तरावर सर्वदूर अभिमानाने आणि औत्सुक्याने पाहिले जात आहे. रायगड, विजयदुर्ग, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, जिंजी, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, खांदेरी, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे बारा दुर्ग ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ या संकल्पनेअंतर्गत युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.

या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कालातीत मूल्ये भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, दि. ७ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान प्रभादेवी, मुंबई येथे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मध्ये सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई “शिवसंस्कार महोत्सव २०२५” आयोजित करत आहे. हा महोत्सव इतिहास, संस्कृती आणि प्रेरणेचा सुंदर संगम ठरेल.

शिवसंस्कार महोत्सव केवळ इतिहासाचे सादरीकरण म्हणून नव्हे, तर आजच्या नागरिकांसाठी, तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती, नेतृत्व, नीतिमत्ता, चारित्र्य आणि एकता या मूल्यांची आठवण करून देणारा एक जिवंत अनुभव असेल. सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई गेली १५ वर्ष हा अनमोल वारसा जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहे.

लेखक, गीतकार आणि या उपक्रमाचे सर्वेसर्वा श्री. अनिल नलावडे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन केवळ लढाया आणि विजयांपुरते मर्यादित नाही; त्यात दूरदृष्टी, नीतिमत्ता, नेतृत्वाचे आणि राष्ट्राप्रती आपल्या कर्तव्याचे अमूल्य धडे आहेत. शिवसंस्कार महोत्सवाद्वारे आम्हाला ही मूल्ये तरुण पिढीपर्यंत पोहोचवायची आहेत, जेणेकरून ते एक मजबूत आणि एकसंघ भारत घडविण्यास मोलाची भूमिका बजावतील.”

शिवसंस्कार महोत्सव २०२५ मध्ये मुंबईकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंना अनुभवण्याची संधी मिळणार आहे. महोत्सवाची सुरुवात ‘शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालनाने’’ होणार असून हे कलादालन दि. ७ ते १३ सप्टेंबरदरम्यान रोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तळ मजल्यावरील आर्ट गॅलरीत होईल. यात श्री. अनिल नलावडे यांनी गेली अनेक वर्ष अभ्यास करून लिहिलेल्या व त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या १५० पेक्षा जास्त चित्रकाव्यरूप कलाकृतींचा समावेश असेल. यातील काही व्यक्तिचित्र चित्रकार राम देशमुख यांच्याकडून तयार करुन घेतली गेली तर काही AI न्यूरल रेंडरिंगच्या माध्यमातून सईशा प्रोडक्शन्स मुंबईने तयार केली. 

“सईशा प्रोडक्शन्स मुंबई यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आवाहन केलं आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसहित ‘शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालनाला’ नक्की भेट द्यावी. या प्रदर्शनातून त्यांना भारताचा समृद्ध इतिहास आणि राष्ट्रीय वारसा अनुभवता येईल.”

कार्यक्रम संचालक, दिग्दर्शक व निवेदक पद्मश्री राव म्हणाल्या, “हा महोत्सव म्हणजे छत्रपती शिवरायांना पुन्हा नव्याने जाणून घेण्याची संधी – फक्त एक शूर योद्धा म्हणून नव्हे, तर दूरदृष्टी असलेले राजकारणी आणि नैतिक शक्तीचा आधारस्तंभ म्हणूनही. कविता, गाणी आणि संवाद यांच्या माध्यमातून आम्ही इतिहास आणि आजचा काळ यांच्यातला संबंध अजून जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहोत.”

दि. ८ ते १२ सप्टेंबर दरम्यान दररोज आयोजित होणाऱ्या ‘युद्धापलीकडले शिवराय ’ या चर्चा मालिकेचा विशेष भाग असेल. या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांवर आणि नेतृत्वावर प्रकाश टाकण्यात येईल. पद्मश्री राव आणि अनिल नलावडे हे महाराजांच्या विविध पैलूंवर माहितीपर सत्र घेणार आहेत. या माहितीपर सत्रासाठी दररोज ५० मर्यादित आसने असणार आहेत.

१४ सप्टेंबर रोजी ‘शिवराय जगतांना’ या कार्यक्रमात कविता, संवाद आणि अनप्लग्ड संगीत एकत्र आणून सह्याद्री, राजमाता जिजाऊ, किल्ले, दूरदृष्टी आणि स्वराज्य यांसारख्या विषयांचा शोध घेतला जाईल. तसेच, कला अकादमीच्या मिनी सभागृहात शिवचरित्रावर आधारित श्री. अनिल नलावडे यांनी लिहिलेल्या पाच नवीन गाण्यांचे प्रकाशन होईल. यात कलाकार श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी, पद्मश्री राव आणि अनिल नलावडे सहभागी होतील.

महोत्सवाचा समारोप १४ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर येथे ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ या संगीतमय ऐतिहासिक कार्यक्रमाने होईल. ४३ नवीन रचनांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी जीवन सादर करणाऱ्या या पुरस्कारविजेत्या संगीतमय कार्यक्रमात नचिकेत देसाई, श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी, अनिल नलावडे आणि पद्मश्री राव सहभागी होतील. हा कार्यक्रम फक्त सशुल्क रू. १५०/- इतका असेल. याची तिकिटे बुकमायशो वर उपलब्ध आहेत. बाकी सर्व उपक्रम विनामूल्य आहेत.

हा महोत्सव फक्त कार्यक्रमांची मालिका नाही, तर विचार जागवणारा, प्रेरणा देणारा आणि समाजमनाला घडवणारा शिवसंस्कार आहे.

या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, शिवसंस्कारांची ऊर्जा स्वतः अनुभवा, सोबत इतरांना ही अनुभवण्यासाठी घेऊन या.. कारण ‘शिवचरित्र हा राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया आहे.’

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.