ताज्या घडामोडी

‘डिव्हाइन सरेंडर’ — शांतता, जागृती आणि करुणेचा संदेश देणारे बौद्ध गीत मुंबईत सादर

जागतिक शांततेला समर्पित: आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या उपस्थितीत ‘डिव्हाइन सरेंडर’ अँथम मुंबईत लाँच, बुद्धांच्या शिकवणींचा वैश्विक संदेश झाला व्यापक

मुंबई, 25 ऑक्टोबर 2025 : संगीत, जागरुकता आणि आध्यात्मिकतेची सांगड घालणारे ‘डिव्हाइन सरेंडर – द बुद्धिस्ट अँथम ऑफ पीस, अवेकनिंग अँड कंपॅशन’ हे गीत चर्चगेटमधील डाऊनटाऊन 20 हॉल येथे आयोजित कार्यक्रमात अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आले.

माजी मंत्री आणि विद्यमान आमदार श्री. राजकुमार बडोले यांनी लिहिलेल्या या गीतामध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी असलेल्या शांतता, आत्मबोध आणि करुणा या मूल्यांचा संदेश अंतर्भूत आहे. या गीतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेले अभिनेते गगन मलिक यांनी प्रतीकात्मक भूमिका साकारली आहे, तर सुप्रसिद्ध बौद्ध संगीतकार पावा यांनी संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केले असून ध्यान, संगीत आणि जागरूकतेचा अद्वितीय संगम साधत त्यांनी हे गीत अधिक प्रभावी केले आहे. या आध्यात्मिक निर्मितीमध्ये दिग्दर्शक निराज प्रभाकर यांनी कलात्मकतेची भर घातली आहे आणि युगंधर क्रिएशन्सच्या अनिकेत बडोले यांनी या गीताची निर्मिती केली आहे. हे गीत थाई, व्हिएतनामी, श्रीलंकन, कंबोडियन, बांगलादेशी अशा अनेक भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

आग्नेय आशियातील प्रतिष्ठित स्टुडिओंपैकी एक असलेल्या बँकॉकमधील स्टुडिओ 28 मध्ये हे गीत रेकॉर्ड करण्यात आले असून भव्य सिंफनी ऑर्केस्ट्राच्या सुरावटींमुळे पूर्वेकडील आध्यात्मिकता आणि जागतिक ऑर्केस्ट्रल संगीताची सांगड घातली गेली आहे. बुद्धांची शाश्वत शिकवण संगीतासारख्या वैश्विक भाषेतून साजरी करत विविध संस्कृतींना जोडणारा कलात्मक सेतू म्हणून या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. युगंधर क्रिएशन्सतर्फे सादर करण्यात आलेले ‘डिव्हाइन सरेंडर’ हे संगीत, अध्यात्म आणि जागतिक ऐक्य यांना एका मंचावर एकत्र आणणारी एक कलात्मक भेट आहे.

या गीताच्या लाँचच्या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. रॉयल थाई कॉन्स्युलेट, मुंबईचे कॉन्सुल-जनरल श्री. डॉनाविट पूल्सवात आणि महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून श्रीलंकेच्या कॉन्सुल-जनरल शिराणी अरियारत्ने, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे, सिद्धिविनायक सिने आर्ट्स (प्रा.) लिमिटेडच्या चेअरपर्सन कौशल्या विक्रमसिंघे, तसेच थायलंडचे उद्योजक आणि संशोधक ॲक्ट. कॅप्टन नट्टाकिट चायचलेर्ममोंग्खोन आणि युगंधर क्रिएशन्सचे निर्माते श्री. अनिकेत बडोले उपस्थित होते. तसेच या गीताचे संगीतकार व गायक पावा, ख्यातनाम अभिनेते गगन मलिक आणि ‘डिव्हाइन सरेंडर’ म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शक निराज प्रभाकर यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढली.

लाँच कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे म्हणाले, “आज ‘डिव्हाइन सरेंडर’ हे सुंदर गीत थायलंडच्या सहकार्याने सादर करण्यात आले असून, हा सोहळा पाहून मला खरोखर आनंद झाला. संस्कृती आणि सर्जनशीलतेची जाण असलेले कलाकार राजकारणातही आहेत आणि आपल्या नेतृत्वाकडून अशा उपक्रमांना चालना मिळताना पाहून अभिमान वाटतो. या गीताच्या संपूर्ण टीमला माझ्या हार्दिक शुभेच्छा.”

रॉयल थाई कॉन्स्युलेट, मुंबईचे कॉन्सुल-जनरल श्री. डॉनाविट पूल्सवात म्हणाले, “भगवान बुद्धांच्या सामायिक ज्ञानाने जोडल्या गेलेल्या थायलंड आणि भारत या दोन देशांमध्ये नाते निर्माण करणारा ‘डिव्हाइन सरेंडर’सारख्या उपक्रमाचा अनुभव घेणे आनंददायी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये शतकानुशतके जपण्यात आलेली शांतता आणि करुणा ही मूल्ये गीत-संगीतासारख्या वैश्विक भाषेतून प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली आहेत.”

श्री. राजकुमार बडोले म्हणाले, “‘डिव्हाइन सरेंडर’ हे केवळ एक गीत नाही, तर जागतिक ऐक्यासाठीची एक प्रार्थना आहे, आपल्या अंतर्मनातील दैवी सत्यासमोर केलेले समर्पण आहे. या गीतातील शब्दांच्या माध्यमातून भौगोलिक सीमा ओलांडून शांततेचा संदेश देण्याची कल्पना मी केली होती. पावा यांचे मनाला स्पर्श करणारे संगीत थायलंडमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आणि गगन मलिक यांच्या परिणामकारक उपस्थितीमुळे ते जिवंत झाले असून हे गीत म्हणजे भारत व जगातील करुणेचा सेतू झाले आहे.”

आपले मनोगत व्यक्त करताना पावा म्हणाले, “ही गीतनिर्मिती करताना लोकांनी थोडा ठहराव घ्यावा, मोकळा श्वास घ्यावा आणि आपल्या अंतर्मनात वसलेल्या करुणेशी पुन्हा एकदा जोडले जावे, ही भावना माझ्या मनात होती. बुद्ध संगीत हे केवळ संगीत नसून ध्यानाचा मार्ग आहे.”

या गीतामध्ये भूमिका साकारणारे श्री. गगन मलिक म्हणाले, “आज जग ज्या टप्प्यातून जात आहे, त्या पार्श्वभूमीवर शांततेची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी असलेले महान विचारवंत होते. करुणा आणि समता या मूल्यांमुळेच मानवजातीला योग्य मार्ग सापडू शकतो, हे त्यांना खूप आधीच समजले होते. ‘डिव्हाइन सरेंडर’च्या माध्यमातून शांतता आणि जागृतीचा संदेश पुढे नेण्याची संधी मिळाल्याचा मला मनापासून आनंद आणि कृतज्ञता वाटते.”

या कार्यक्रमामध्ये संस्कृती, कला आणि अध्यात्माचा प्रेरणादायी संगम अनुभवायला मिळाला. शांतता आणि जागृतीचा संदेश देणाऱ्या या गीताच्या उत्सवानिमित्त अनेक मान्यवर, भिक्खू, कलाकार आणि सृजनशील क्षेत्रातील व्यक्ती एका छताखाली एकत्र आले. हे वातावरण अत्यंत शांत व चिंतनास उद्युक्त करणारे होते. या ठिकाणी लाइव्ह परफॉरमन्सेस सादर झाले आणि शांततेचे क्षण अनुभवता आले, ज्या माध्यमातून आत्मचिंतन व एकोप्याला चालना मिळाली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतातून जगभर पसरत असलेल्या बौद्ध कला आणि संगीतातील प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. तत्त्वज्ञान, सर्जनशीलता आणि श्रद्धेचा संगम असलेल्या या अनुभवामुळे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनावर खोल ठसा उमटला गेला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.