ताज्या घडामोडी

५६ वर्षांत मराठी चित्रपटाने ‘इफ्फी’मध्ये प्रथमच मारली बाजी

‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

Zराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोककलेचा थाट आणि आधुनिक जगण्याच्या नवनव्या छटा मांडणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ताकद दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. गोव्यात झालेल्या भारतीय सरकारच्या ५६व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी)मध्ये ‘गोंधळ’ने ‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. गेल्या ५६ वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’चा अवॉर्ड मिळाल्याने हा विजय अधिकच ऐतिहासिक ठरला आहे.

यंदा ‘इफ्फी’मध्ये ११३० चित्रपटांची नोंदणी करण्यात आली होती. त्यातील ५७० फिचर फिल्म्स होत्या. त्या चित्रपटांमधून हा ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका’चा अवॉर्ड ‘गोंधळ’ला मिळाला असून पंधरा लाख रुपये रोख आणि मानांकन असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा सोहळा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॅा. एल. मुरुगन, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, ऋषभ शेट्टी, रणबीर सिंग, नवाजुद्दीन सिद्दीकी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

२०१९ ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाच्या लिजो जोस यांना ‘सिल्व्हर पिकॅाक सेक्शन’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका’साठी अवॅार्ड मिळाला होता. त्यानंतर कोणत्याही भारतीय चित्रपटाला ‘सिल्व्हर पिकॅाक सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाला नव्हता. यंदा हा अवॅार्ड भारताला मिळाला असून तसेच ५६ वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हा अवॅार्ड मिळाल्याने मराठी सिनेसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात अवॅार्ड मिळालेला ‘गोंधळ’ हा एकमेव चित्रपट आहे. संतोष डावखर यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असतानाही त्यांना थेट ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका’चा अवॅार्ड मिळाला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट आपल्या मातीत रुजलेल्या श्रद्धा, लोकपरंपरा आणि मानवी भावना यांचं प्रभावी चित्रण करतो. नवरा–नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या ‘गोंधळ’ या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहाणारी कथा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहाता अंधश्रद्धा, कुटुंबातील नात्यांचे संघर्ष, समाजात बदलणारे दृष्टिकोन आणि माणसांच्या मनात दडलेला रहस्याचा धागा यांचाही वेध घेते. भव्य सादरीकरण, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक दृष्टीने उत्तम बांधणी यामुळे ‘गोंधळ’ मराठी संस्कृतीचं मूळ जागतिक प्रेक्षकांसमोर ताकदीने सादर करणारा ठरतोय.

या यशानंतर आपल्या भावना व्यक्त करताना दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, ‘‘‘इफ्फी’ सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात ‘गोंधळ’ला मिळालेला हा सन्मान आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा गौरव आहे. हा चित्रपट म्हणजे आपल्या संस्कृतीशी, मातीशी आणि लोकपरंपरांशी असलेलं नातं आहे. जागतिक पातळीवर मराठी कलेला मिळालेली ही दाद आमच्यासाठी शब्दात मावणं कठीण आहे. हा आमच्या मातीतल्या कलेचा, श्रद्धेचा आणि अस्सल भावविश्वाचा सन्मान आहे.’’

‘गोंधळ’ची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन संतोष डावखर यांनीच केले असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके या भक्कम कलाकारांची फळी या चित्रपटात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.