क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

लव फिल्म्सच्या ‘देवमाणूसमध्ये ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर !

मराठी चित्रपटसृष्टीत आता उत्साह आणि सौंदर्याची लाट उसळणार आहे, कारण सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात ‘आलेच मी’ म्हणत पहिल्यांदाच शानदार लावणीवर थिरकणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई, ‘आलेच मी’ या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर येत आहे. पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात हे गीत साकारण्यात आले असून रोहन प्रधान यांनी त्यांना साथ दिली आहे. रोहन-रोहन यांचे संगीत लाभलेले हे गाणे तेजस देऊस्कर यांनी लिहिले असून रोहन गोखले यांनीही अतिरिक्त गीतलेखन केले आहे. सुप्रसिद्ध लावणी तज्ज्ञ आशीष पाटील यांनी या गाण्याची नृत्यरचना केली आहे, जी अत्यंत जोशपूर्ण आणि सुरेख आहे.

गाणे येथे पहा: https://www.youtube.com/watch?v=8GfvT03NunQ

या भूमिकेसाठी सईने तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक वेळ सरावाला दिला, लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली आणि एक धमाकेदार परफॉर्मन्स तिने सादर केला आहे. आपल्या अनुभवाबद्दल सई म्हणते, “’देवमाणूस’मध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. गाणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन हलली. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडले, याबद्दल मी खूप आभारी आहे. आशीषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवे रूप आवडेल, अशी आशा आहे!”

‘आलेच मी’ हे गाणे त्याच्या भन्नाट बीट्स, आकर्षक सादरीकरण आणि सईच्या जबरदस्त उपस्थितीमुळे लवकरच टॉप लिस्टमध्ये झळकण्यास सज्ज आहे.

लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित देवमाणूस २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.