ताज्या घडामोडी

महापूर’ नाटकाचा भव्य प्रीमियर…

हल्ली नवे विषय, नव्या संहिता रंगभूमीवर सादर होत आहेत. तर दुसरीकडे काही जुन्या, दिग्गज नाटककारांच्या त्या काळात लिहिलेली, सादर झालेली नाटकं पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आलेली पाहायला मिळत आहेत. ही नाटकं पुन्हा रंगभूमीवर येण्यामागचं मुख्य कारण असतं ते, त्या नाटकाची भक्कम संहिता. आधुनिक मराठी रंगभूमीवरचा एक निर्णायक टप्पा ठरलेले नाटक ‘महापूर’. या नाटकाला ज्येष्ठ लेखक सतीश आळेकर यांच्या लेखणीने एका वेगळ्याच उंचीवर नेले. हे नाटक आता त्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा रसिकांसमोर आलं आहे. 

अभिनेता आरोह वेलणकर याने या नाटकासाठी पुढाकार घेतला आहे. या नाटकाची निर्मिती वाइड विंग्ज मीडिया करत असून, दिग्दर्शन ऋषी मनोहर करत आहे. पुण्यात झालेल्या यशस्वी प्रयोगांनंतर ‘महापूर’ नाटकाचा भव्य असा प्रीमियर मुंबईत १५ ऑगस्टला रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

 

यावेळी बोलताना अभिनेता आरोह वेलणकर म्हणाला की, ‘१५ वर्षांपूर्वी पुरुषोत्तम करंडकच्या दरम्यान ज्येष्ठ समीक्षक माधव वझे यांनी हे नाटक तू करायला हवं असं मला सांगितलं. तेव्हापासून हे नाटक करण्याचा माझा मानस होता. मध्यंतरी सतीश आळेकरांची एक शॉर्ट फिल्म करत असताना हे नाटक मी करू का ? अशी विचारणा त्यांना केली. योगायोगाने या नाटकाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असून हे नाटक तू अवश्य सादर कर यासाठी सतीश आळेकरांनी मला परवनगी दिली आणि आज हे नाटक आज तुमच्यासमोर सादर करताना अतिशय आनंद होत आहे’.

१९७५ साली रंगमंचावर अवतरलेल्या ‘महापूर’ नाटकातील मोहन गोखले यांनी साकारलेली भूमिका मी करत असून, माझ्यासाठी ही माईलस्टोन भूमिका आहे. सुरुवातीला प्रायोगिक म्हणून उचलेलं हे पाऊल आता व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्हाला सादर करायचं आहे. पहिल्या काही प्रयोगाला मिळालेल्या प्रतिसादानंतर मुंबईत भव्य असा नाटकाचा प्रीमियर करीत हे नाटक अधिकाधिक नाट्यरसिकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

गाजलेली कलाकृती पुन्हा सादर करण्याचा आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक ऋषी मनोहर यांनी सांगितले की, ‘सतीश आळेकरांची ही संहिता इतक्या वर्षांनीही तितक्याच ताकदीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. याच समृद्धतेचा अनुभव नाट्यरसिकांना पुन्हा देता येतोय हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. प्रत्येक प्रयोगानंतर कलाकार निवडीबद्दल झालेलं कौतुक ही नाटकाच्या यशाची पावती आहे.

सध्या रिकॉलचा काळ आहे. एकेकाळी गाजलेल्या नाटकांचे पुन्हा सादरीकरण करीत ते भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची संकल्पना मोलाची आहे. कलाकार म्हणून तितकंच समाधान देणारी ही भूमिका असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री रेशम श्रीवर्धनकर, यांनी केले.

महापूर’ ही नाट्यकहाणी प्रेमभंग, शिक्षणातील बेताची गती, आळस आणि गुंतागुंतीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तोल ढळलेल्या एका तरुणाच्या मानसिक अवस्थेचे संवेदनशील चित्रण करते. यात नायकाची व्यक्तिगत घुसमट प्रेक्षकांसमोर उलगडली जाते. आरोह वेलणकर, दिलीप जोगळेकर प्रसाद वनारसे, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. 

नाटकाचे निर्मितीप्रमुख कुशल खोत तर निर्मिती व्यवस्थापक सौरभ महाजन आहेत. पार्श्वसंगीत सारंग कुलकर्णी यांचे आहे. प्रकाशयोजना तेजस देवधर तर वेशभूषा देविका काळे यांची आहे नेपथ्यरचना ऋषी मनोहर, मल्हार विचारे यांची आहे. दिग्दर्शन साहाय्य आणि रंगमंच व्यवस्था वज्रांग आफळे, गणेश सोडमिसे, मल्हार विचारे, प्रणव शहा यांनी सांभाळली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.